Friday, October 03, 2008

?????

ढगाळ वातावरण, भरून आलेलं आभाळ, त्याबरोबर येणारी हलकिशी थंडी, नीरव शांतता, अधून मधून एखादी गाडी इकडेतिकडे, कोणाचेतरी बोलणे,... आणि या सगळ्याबरोबर येणारी एकटेपणाची तीव्र जाणीव..... तो कोसळायला कधीही सुरुवात होईल.

पण आजकाल पूर्वीसारखं होत नाही... ती भीती, हुरहुर वाटत नाही, कसलातरी इनडिफरन्स भरून राहिलाय. इनडिफरन्सच का नक्की? Nothing is felt for anything... it does not reach down beyond a point....

तो एकटेपणा त्रास नाही देत... आणि आनंदही.... काय झालंय, भावना थिजल्यात, जाणीवा बोथट झाल्यात?? .... की, मी शांत होतोय... कुठेतरी बंद होऊनही उलगडतोय?????

Tuesday, August 19, 2008

ना-पेक्षित ना-पेक्षाभंग, रॉर्क आणि स्वातंत्र्य

गेले काही दिवस आयुष्य एकाच प्रश्नाभोवती गुरफटून गेलं होतं, बाकी काही विचार होत नव्हता, जाणीवा बोथट झाल्यासारखं झालं होत काहीसं, शेवटी काल एकदा तो प्रश्न निर्णायक वळणावर आला आणि मग आज बाकीच्या गोष्टींना जागा निर्माण झाली...

(प्रश्न काय? कसला? असे प्रश्न विचारू नका.. उत्तरं मिळणार नाहीत.. ) असो.. तर प्रश्न पण एकदम गंमतदार बरं का.. म्हणजे normally कसं प्रश्न काय आहे वगैरे वगैरे आपल्याला माहिती असत, उत्तरांची अपेक्षा असते.. इथे प्रश्नच माहिती नव्हता, असलाच तर उत्तर अजिबात अपेक्षित नव्हतं.. पण मग उगाच आडवळणाने, घुसखोरी करून उत्तर आलंच, जणू काही प्रश्नाला उत्तराची नाही तर उत्तराला प्रश्नाची गरज असल्यासारखं... आलं ते आलं.. गप्प बसेल नं, पण नाही, तेही नाही.. जाताना नसलेल्या अपेक्षांचा भंग करून गेलं... काहीतरी विचित्र वाटलं राव यावेळी.. म्हणजे उत्तर अपेक्षित असलं की कसा अपेक्षित अपेक्षाभंग होतो.. इथे मात्र ना-पेक्षित ना-पेक्षा भंग झाला.. असो, काही का असेना.. शेवटी कोणत्यातरी थांब्यावर तर आली गाडी.. हे हि नसे थोडके..

तर... अस सगळं झाल्यावर आज एकदम बाकीच्या गोष्टी करायला वेळ मिळाला.. म्हणजे तशा आधीही करत होतोच.. पण सांगितल्याप्रमाणे, त्यांची जाणीव आज एकदम झाली. दुपारी दुपारी, बाठे वाचले (संदर्भ : http://abhijitbathe.blogspot.com/) आणि मग गुदगुल्या करणाऱ्या स्वप्नातून कोणीतरी खाडकन मुस्काडित मारून उठवावं तसा जमिनीवर आलो, बरं वाटलं.. हा प्राणी अस काय लिहितो काय माहिती पण एकदम विचित्र, खूप अस्वस्थ feeling येत, हरल्यासारखं... पण हवंहवंस वाटणारं.. "हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे, नको नकोसे हळवे कातर बोलू काही.. " तसं काहीसं.. त्याच "दादरू-लेस्टर" वाचलं, "चर्च के पीछे, पचपन खंबे लाल दीवार, एक बरबाद पंधरा ऑगस्ट.. " अस सगळं सगळं वाचून काढलं.. खूप अस्वस्थ झालो, ते लिखाण करतच अस्वस्थ.. मागे मी BE ला असताना लोकसत्ता की सकाळमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटोंचे छोटे छोटे लेख यायचे.. ते वाचून तेव्हा त्यांना भेटायची खूप इच्छा होती.. मुंबईला गेल्यावर त्यांचा पत्ता हुडकून काढून त्यांना भेटायचं ठरवलं होत, बघायचं होत त्या माणसाला, बोलायचं होत त्यांच्याशी, तसंच काहीसं या प्राण्याबद्दल, याला भेटायचंय, याच्याशी बोलायचंय....

आणि हो, आईला पत्र लिहायचंय.. कागद पेन घेऊन.. लिही म्हणाली, बरेच दिवस झाले, लिहिलंच नाहियेस तू.... आयला, खरंच की.. कागद पेनांच्या पत्रांना किती वर्ष झाली लिहून.. पण त्यातच खरी मजा आहे.. प्रबोधिनीने मला लिहिलेल पत्र, ऋचाचे पत्र.. टाइम मशीनच ते.. वाचायला घेतलं, त्यावरून हात फिरवला की ते आपल्याला अलगद नेऊन सोडत भूतकाळात...

सध्या, "The Fountainhead" वाचतोय.. ऱॉर्कने वेड लावलंय, झपाटून टाकलंय... मी दहावीत बोर्डात आलो तेव्हा कोणीतरी मला "एक होता कार्वर" भेट दिले होते. माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर भेट. कार्वरच्या आयुष्याने झपाटून गेलो होतो.. गेलो होतो काय, आजही गेलोय.. त्याने जितकं केलंय त्याच्या एक टक्का जरी मला माझ्या आयुष्यात करता आलं तर मी स्वतःला धन्य समजेन.. जेव्हा कधी मन उदास होत, समोरचा रस्ता धूसर होतो तेव्हा मी मग कार्वरकडे जातो. उत्तरे मिळतातच असे नाही, पण उत्तर हुडकायची ऊर्मी मिळते जरुर.. पुढच्या आयुष्यात आता कार्वर बरोबर रॉर्ककडे पण जावे लागणार.. it's inevitable :)

रॉर्क एक architect, म्हणजे पदवीने नाही, कारण पदवी मिळायच्या आधीच त्याला कॉलेजने हाकलून दिलंय..त्याचा गुन्हा काय.. तर तो त्याच्या कामावर मनापासून प्रेम करतो, पोटतिडकीने प्रेम करतो.. हाच त्याचा गुन्हा. दुर्दैवाने उसने विचार आणि उसनी ध्येय असलेल्या इतरांसाठी, तथाकथित समाजासाठी मग तो धोका ठरतो आणि म्हणून मग त्याची हकालपट्टी ठरलेली.. पण रॉर्कच तो, त्याला काही फरक पडत नाही.. का पडावा? "मी रस्त्यावर राहीन, ग्रॅनाइटच्या खाणीत काम करेन, मैलोनमैल पायपीट करेन पण वास्तू बनवेन तर ती मला हवी तशीच, त्याबाबत तडजोड नाही.. वास्तू म्हणजे मानवी शरीरच जणू.. मानवी शरीरात कसे सर्व अवयव उपयोगी, प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व, महत्त्व असलेलं, पण तरीही शरीरात चपखल गुरफटलेले.. तशीच काहिशी वास्तू,, मग तिथे कशाला हवेत दारावर शोभेचे हत्ती, बिनकामाचे ग्रीक पिलर... बाकी काही सांगा, मी करेन, पण माझ्या प्रेमाच्या आड मी येऊच देणार नाही तुम्हाला, माझ्या वास्तूच्या आड येऊनच देणार नाही तुम्हाला..... " असा काहीसा ध्येयवेडा रॉर्क, त्याच्या प्रत्येक वास्तूपासून त्याला वेगळा काढण्याचा व्यर्थ प्रयत्न कोणी करू नये....

आणि मग पीटर किटींग.. रॉर्कचाच मित्र, कॉलेजमध्ये गोल्ड मेडल आहे.. आर्किटेक्ट झालाय पण आईने सांगितले म्हणून, नोकरी करतोय ते ठिकाण पण आणि कोणी सुचवले म्हणून, घर बांधतोय ति पण लोक सुचवतात तशीच, किंवा कोणी आधी बांधून ठेवलियेत तशीच.. मग लांड्यालबाड्या करणारा किटींग, केवळ धंद्यात पार्टनर होता यावं म्हणून बॉसच्या पोरीशी लग्न करायला निघणारा किटींग, आपल्या इनसिक्युरिटिज लपवण्यासाठी मोठ्या पार्ट्यांमध्ये जाणारा, मोठी मोठी भाषणं ठोकणारा किटींग, रॉर्ककडे जे आहे ते माझ्याकडे नाही, रॉर्कच्या थंड पण खंबीर स्वभावावर चिडणारा, त्याचा रागराग करणारा, समाजाच्या तथाकथित मापदंडांवर अत्यंत यशस्वी असलेला असा हा पीटर किटींग....

असे पीटर किटींग पैशाला पाच पन्नास सापडतात.. कामाच्या ठिकाणी, मीटिंगमध्ये, चहाच्या कट्ट्यावर, सिगरेटच्या अड्ड्यावर, शुक्रवारच्या पार्टीत.. बॉस समोर नसला की त्याला यथेच्छ शिव्या देणारे, तो समोर आला की त्याची हुजरेगिरी करणारे, तब्येतीत प्रमोशन मिळवणारे, ८ ते ५ फक्त पाट्या टाकणारे असे हे असंख्य पीटर किटींग.. मला कधी कधी कळत नाही, ही माणसं कामासाठी काम कधी करतच नाहीत का? आपण काम करायचं ते फक्त आपल्या वरच्याला उत्तर देता यावं म्हणून? मग सुरेशची जॉनला उत्तर देता यावं यासाठी धडपड, जॉनची त्रिशाला उत्तर देता यावं यासाठी धडपड... ते उत्तर मिळालं की आपलं काम झालं.. आपलं पोट वेळेवर भरतंय ना, नियमित पगार जमा होतोय ना, वरचा आपली मारत नाही ना आणि खालच्याची आपण व्यवस्थित मारतोय ना यात धन्यता मानणारे असे हे असंख्य पीटर किटींग.. त्यांना रॉर्क धोक्यासारखा वाटणारच..... रॉर्कबद्दल मी लिहिणं म्हणजे उत्तुंग पहाडाला हात घालण्यासारखा आहे......... छे, हे मी काय सांगत बसलोय.. म्हणजे, रॉर्क ही काही सांगायची गोष्ट आहे का? रॉर्क सांगायचा नाहीच, बोलायचाही नाही, रॉर्क फक्त अनुभवायचा, feel करायचा.. आणि ज्यांना तो कळला त्यांनी तो आठवायचा.. एकत्र येऊन.. रॉर्कबद्दल काहीही न बोलता.....

आजकाल लायब्ररीत जातोय नियमितपणे. इथल्या लायब्ररीत बऱ्याच गोष्टी मिळतात, पुस्तके, CDs, DVDs, Cassettes वगैरे वगैरे... सध्या रॉर्क हाती असल्याने दुसरं पुस्तक हाती पडणं शक्यच नाही, म्हणून मग DVDs आणतो... मागच्या आठवड्यात Seabiscuit बघून झाला, अप्रतिम कलाकृती, माझ्या कलेक्शन मध्ये आणि एकाची भर.. (त्यावर लिहायचंय.. पण ते नंतर कधीतरी, आता नको.. ) या आठवड्यात बऱ्याच documentaries आणल्यात.. 49UP, some oscar winner short films, Newton's darsk secrets आणि Daughters of Afganistan...

"Daughters.. " तालिबान्यांच्या पाडावानंतरच्या अफगाणी स्त्रीजीवनाचा आढावा घेते, इतक्या सुंदर सुंदर पोरी, त्यांचं ते अप्रतिम सौंदर्य आणि आसपासचा भीषण उध्वस्त प्रदेश.. "Daughters.. " सांगते ते त्यांच्या लढ्याची, स्वातंत्र्याची कहाणी.... अर्रे हो.. मागच्याच आठवड्यात आपला पण स्वातंत्र्यदिन होता नाही का... छे.. इकडे अमेरिकेत एक हक्काची सुट्टी गेली हातून, शिवाय लाऊडस्पीकर वर लागलेली मनोजकुमारची गाणी आणि गरमागरम जिलब्या, त्यांची पण मज्जा नाही यावर्षी... आणि काय आहे म्हणा स्वातंत्र्य म्हणजे आणखी? आहे का काही....?

मीटिंगमध्ये जीमने स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या, म्हणाला.. "we can connect to each other.. we both got freedom from brits.. "... मी म्हणालो, "येस, आजच्यादिवशीच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले.. म्हणजे डाव्या, उजव्या हाताला वेगळे आणि बाकीच्या धडाला वेगळे.. आजकाल आम्ही भांडतोय ते डोक्यावरून, हात म्हणतात डोकं माझं, धड म्हणतंय डोकं माझं... पण तरीही स्वातंत्र्य मिळालच की.. ते कस विसरणार.. पूर्वी brits आमच्या उरावर बसायचे, आजकाल आम्हीच आमच्या उरावर बसतो... मोठ्ठ अवघड असत ते.. तुम्हाला नाही समजायचं.. तुम्ही अजूनही दुसऱ्यांच्याच उरावर बसता.... "

५७ वर्षाचा म्हातारा जीम, आता स्वेच्छानिवृत्ती घेतोय.. परवा मीटिंगमधून निघून तडकाफडकी घरी गेला आणि पेपरवर सही करून कंपनीच्या तोंडावर फेकले.. म्हणाला, "आता कंटाळलोय खूप, फार झालं.. ", म्हणाला, "अजून ५ वर्ष आहेत काम करायची.. मला बारटेंडर व्हायचंय... ". एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये प्रोग्रॅम मॅनेजर म्हणतो की त्याला बारटेंडर व्हायचंय... "मला लोकांशी निर्भेळपणे कनेक्ट व्हायचंय, त्यांच्यात मिसळायचंय, मला माझं घर रंगवायचंय, स्वतःच्या हातांनी, यार्डात लाकडं फोडायची आहेत आणि एक खोपटं बांधायचंय.. मला निर्मिती बघायचीये.. excel sheet, powerpoint पलीकडे जाऊन मला काही निर्माण करायचंय..., मला जरा स्वतंत्रपणे जगायचंय.. "

त्याला म्हणालो, "किती स्वातंत्र्य मिळवलियेत आम्ही, आधी मोगलांपासून हिंदवी स्वराज्याच स्वातंत्र्य, मग ब्रिटिशांपासून भारताच स्वातंत्र्य.. पण काही बदललं का? म्हणजे स्वातंत्र्यामुळे काही कायमच बदललं का? रक्तच प्यायचं तर गोऱ्यांनी प्यायलं काय आणि काळ्यांनी प्यायलं काय? देसीनी प्यायलं काय आणि फिरंगीनी प्यायलं काय? सगळं सारखंच की..... ", म्हणालो, "वैश्विक स्वातंत्र्य वगैरे अस काही असत का रे? म्हणजे अशिक्षितपणापासून स्वातंत्र्य, जात, धर्म यापासून स्वातंत्र्य, वर्णभेद, लिंगभेदापासून स्वातंत्र्य, भूकबळी, बालमृत्यू पासून स्वातंत्र्य, भ्रष्ट नेत्यांपासून स्वातंत्र्य, दहशतवादापासून स्वातंत्र्य... असत? " का मग असलं तरी ते स्वातंत्र्यच स्वतंत्र नसत?.. म्हणजे देश, राज्यांच्या सीमात अडकलेलं, समाजाच्या बुरसटलेल्या कुंपणात अडकलेलं... आपलं, आपल्यापुरतंच...

बराच वेळ बोलत राहिलो एकटाच... डोंबिवली फास्टचा माधव आपटे कानात गुंजत होता.. "सगळ्यांनी मिळून खायचं की सगळ्यांचं आपणच खायचं?... अरे, नियम केलेत ना आपण सगळ्यांनी, आपल्यासाठीच, पाळायचं ठरवलंय ना आपणच..? मग मोडायची इतकी घाई का?.... "

Tuesday, July 15, 2008

स्वच्छंद

बाहेर पाऊस पडतोय. खूप सुंदर वातावरण पडलंय. पावसाची अखंड रिपरिप. त्याचा आवाज़ ऐकतोय, कानात साठवतोय. गाडी पळतिये, पावसाला साथ करत "जाने तू या जाने ना" चालू आहे. गाडी उभी करून मग पावसात रेंगाळणं.... परत एकदा गाडी, आता मात्र चित्रा गातेय.. "दिल है छोटासा, छोटी सी आशा".......
आजकाल हे असच होतंय, रोज दुपारी भरून येतं आणि मग भरपूर पाऊस कोसळतो. त्याला बघत, त्याला ऐकत माझे तासन तास जातात, विचारचक्र पळत राहतात. हातात वाफाळणारी कॉफी आणि टेकायला एखादा कठडा असला की झालं. इथे orlando मध्ये तर पाऊस आपल्याबरोबर विजेलाही घेऊन येतो नि मग सुरू होतो एक मस्त खेळ.

किती किती पाऊस अनुभवलेत, लहानपणीचा पाऊस, होड्या सोडायचा पाऊस, आपल्याबरोबर हमखास इलेक्ट्रिसिटी घेऊन जाणारा पाऊस, घराच्या कौलातून हळूच आत डोकावणारा पाऊस, सायकल दामटताना घराची ओढ़ लावणारा पाऊस. तसा तो अजूनही लावतोच, पावसाने काय आभाळच भरून येतं फक्त?

मग मुंबईचा पाऊस, 26 july चा पाऊस, रस्ते भरून वाहणारा पाऊस किंवा मग एखददिवस जगातल्या बाकीच्या गोष्टींना कंटाळून घरी चालताना साथ देणारा पाऊस, आंबोलिचा पाऊस, काशिदचा पाऊस आणि अगदी मायामिचा पाऊस सुद्धा :)

पाण्याला जात्याच एक सुंदर नाद असतो. त्याला तुम्ही संधी द्या फक्त आणि मग निवांत बसून राहा ऐकत. मग तो कोसळणारा पाऊस असो, काशिदचा किंवा पुळ्याचा समुद्र असो, jogfalls असो वा नायगरा असो. मागे राहुल बोसचा एक सिनेमा आला होता, "White Noise". सपाटून आपटला खरा पण आम्हा काही मोजक्या मंडळींना फार आवडला. त्यातल्या हिरोला, राहुल बोसला "white noise" ऐकायचं व्यसन. White noise म्हणजे TV वर मुंग्या येताना जो आवाज़ येतो ना तो. हे सगळे आवाज़ एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात, तंद्री लावतात. लोक वेड्यात काढतात खरं पण काढूदेत.

जेव्हा जेव्हा मी भेटतो तेव्हा तेव्हा सांगतो त्याला, तुझ्यासारखं बनायचंय मला. कोणी असो, नसो, तू कसा तुझं काम करत राहतोस, कोणी काही म्हणो, तुला पक्कं माहितीये तुझ्या आयुष्याचं ध्येय, कर्तव्य. तुला पक्कं माहितीये तुला काय करायचंय. तू आपला किनाऱ्यावर आदळत राहतोस, आभाळातून कोसळत राहतोस किंवा मग स्वतःला ढकलून देतोस कड्यांवरून, तेसुद्धा स्वतःच्या शर्तिँवर, कोणत्याही बंधनात न अडकता, एकदम स्वछ्ंदपणे. मला तस्सच जगायचंय, अगदी तस्सच.